महिला सक्षमीकरणाचा निधी लाटला; चौकशीसाठी सीएमआरसी अध्यक्षांसह महिलांचे उपोषण 

0
117

महिला सक्षमीकरणाचा निधी लाटला; चौकशीसाठी सीएमआरसी अध्यक्षांसह महिलांचे उपोषण
बुलडाणा. (प्रतिनिधी)
.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शासनाकडून विविध उपक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत साखरखेर्डा येथील लोकसंचालित साधन केंद्राला प्राप्त झालेला लाखो रुपयांचा निधी माविमचे समन्वयक अधिकारी व साखरखेर्ड्याच्या व्यवस्थापकांनी सीएमआरसीची बनावट कार्यकारिणी उभी करून लाटला. या सर्व प्रकाराच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसह मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयांकडे करूनही काहीच कारवाई होत नसल्याने संस्थेच्या अध्यक्ष सुनीता खरात यांच्यासह सदस्य महिलांनी स्वातंत्र्यदिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.


साखरखेर्डा लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत सिंदखेड राजा तालुक्यात महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. या गटांमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध उपक्रमांतर्गत निधी मंजूर केला जातो. मात्र, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी व साखरखेर्डा सीएमआरसीच्या महिला व्यवस्थापकाने संगनमताने निधी हडपण्याकरिता सीएमआरसीची बोगस कार्यकारिणी कागदोपत्री तयार केली. बनावट अध्यक्ष, सचिवांच्या नावाने बॅंकेतून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला. प्रत्यक्षात बचत गटाच्या महिलांना लाभ मिळवून न देता हा निधी स्वत:च लाटण्यात आला. विविध प्रकारे निधीत घोळ करण्यात आला आहे. या सर्व प्रकारासंदर्भात साखरखेर्डा लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष सुनीता खरात यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.
न्याय मिळत नसल्याने अध्यक्षा सुनीता खरात, उपाध्यक्ष रंजना गारोळे, रत्नमाला मोरे, चंद्रकोर गवई, कोषाध्यक्ष सुनीता सरकटे, सदस्य प्रमिला गवई, मंदोदरी जाधव, सरस्वती गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. १५ ऑगस्टच्या रात्री या महिलांना पावसात भिजावे लागले. या उपोषणाची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसलीतरी माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

पोलिसांकडूनही ठोस कारवाई नाही
साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. उलट आमच्यावरच दडपण आणले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्या सुनीता खरात यांनी केला आहे.

कृषी औजारे उपक्रमाच्या चौकशीचे पत्र
मानव विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळा (माविम) मार्फत राजेगाव (ता. सिंदखेड राजा) येथील चैतन्य स्वयंसाह्यता बचत गटास ठराव न घेताच अनधिकृतपणे योजनेचा लाभ देण्यात आला. यासंदर्भात तक्रार केली असता मानव विकास समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी माविमच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी औजारे बॅंक उपक्रमाची चौकशी करण्यासंदर्भात ९ जुलै २०२१ रोजी पत्र दिले. पुढे ही चौकशीही थंडबस्त्यात पडल्याचे सुनीता खरात यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here