*कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा भाजपने राजीनामा घ्यावा,शिवरायांबद्दल भाजपचे प्रेम बेगडी:-खासदार प्रतापराव जाधव*
बुलडाणा…(प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य असून त्यांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याच्या घटनेबद्दल कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेले विधान संतापजनक आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा राजीनामा भाजपने घ्यावा. भाजपचे छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम हे बेगडी असल्याचा आरोप शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय
यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भाजपा एका बाजूला निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागते आणि दुसरीकडे दुटप्पी भूमिका वठवायची हे खपवून घेतले जाणार नाही. शिवसैनिकांसह शिवप्रेमीमध्ये संतापाची तीव्र लाट आहे. भाजपच्या नेत्यांनी देखील कर्नाटक चे मुख्यमंत्री यांचा राजीनामा मागितला पाहिजे.अन्यथा त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे
छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार कर्नाटक मध्ये बंगळूर येथे सदाशिवनगर मध्ये घडला. या घटनेत आरोपींना कडक शासन होण्यासाठी पावले उचलण्याऐवजी याबद्दल संतापजनक वक्तव्य कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. या घटनेचा बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. कर्नाटक सरकारची मराठी माणसावर अन्याय करण्याची भूमिका ही निषेधार्ह असून कायम मराठी द्वेष बाळगणाऱ्या भाजपच्या कर्नाटक सरकारचा चेहरा यामुळे उघड झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध शिवप्रेमी करत असताना त्यांच्यावर कर्नाटक सरकारने लाठी चार्ज करत ३०७ सारखे कलम देखील लावल्या. विटंबना करणार्यांना अटक करण्याची कारवाई करण्या ऐवजी शिवप्रेमीवर लाठ्या चालवल्या. महाराष्ट्रात निवडणुकीआधी भाजप “छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले भाजप के साथ” म्हणत महाराजांच्या नावाने मते मागितली. तसेच नुकताच काशी मध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान केले. भाजपला जर खरच शिवरायांचा अभिमान असेल तर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा राजीनामा घ्यावा. एवढेच नव्हे तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. नाहीतर भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. कर्नाटकातील मराठी जनतेवर होत असलेला अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कणभर अनादरही शिवसेना सहन करणार नाही, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत.