‘पत्रमहर्षी’ मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार राजेंद्र काळे यांना जाहीर
बुलडाणा:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने सकारात्मक लेखणासाठी दिल्या जाणाऱ्या ‘पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार’ घोषीत करण्यात आले असून, विदर्भातून ‘देशोन्नती’चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण औरंगाबाद येथे रविवार १६ जानेवारी रोजी सायंकाळी ‘हॉटेल वर्षा इन’मध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड यांच्याहस्ते होणार आहे.
पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार सोहळ्यात ना.डॉ.भागवत कराड यांच्यासह जलदूत शिवरतन मुंदडा तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.वसंत मुंडे राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे डॉ.प्रभु गोरे, जगदीश बियाणी व चंदुलाल बियाणी आयोजक आहे.
सकारात्मक लिखाणासाठी दरवर्षी पत्रमहर्षी मोहनलाल संचेती स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार देण्यात येतात. विविध विभागातून या पुरस्कारांची निवड करण्यात येते. यावर्षी तथा मागील वर्षीचे कोरोनामुळे वितरीत न झालेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यात दै.सुराज्य सोलापूरचे कार्यकारी संपादक राजेश टोळे, दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिरके, सकाळचे बीड प्रतिनिधी दत्तात्रय देशमुख, दिव्य मराठी औरंगाबादचे संतोष देशमुख, संपादक मिडीया वॉच अमरावती अविनाश दुधे, देशोन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, महाराष्ट्र टाईम्सचे खान्देश ब्युरो चिफ प्रविण चौधरी, जळगाव जनशक्तीचे कार्यकारी संपादक युवराज परदेशी, टीव्ही ९ पुणेच्या विशेष प्रतिनिधी अश्विनी सातव/ डोके तर पुढारीचे पुणे येथील विशेष प्रतिनिधी दिगंबर दराडे या राज्यातील १० पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.