बुलडाणा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी निर्भय आणि शांततापूर्ण पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजावावा, जिल्हा आणि पोलिस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे, असा संदेश आज जिल्हा पोलिस दलातर्फे देण्यात आला.
येत्या दि. २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून महिला, युवक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आणि सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता यावे, तसेच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी पोलिस दलातर्फे आज गो वोट-चला जाऊया मतदानाला हा सामाजिक संदेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडलेल्या या मतदार जाणीव जागृती कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक मसूद खान, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे, पोलिस निरीक्षक विकास तिडके उपस्थित होते.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे युवक, नवमतदार, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक व सर्वसाधारण मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच सर्व नागरिकांनी मतदान करून मतदानाचे प्रमाण वृद्धिंगत करण्याचा संदेश प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी जाणीव-जागृतीच्या उद्देशाने पोलिस दलातर्फे आज गो वोट-चला जाऊया मतदानाला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी, बलशाली भारताची लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचे राष्ट्रीय कार्य पार पाडावे, असे आवाहन केले. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावावा, त्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन कटीबद्ध असून खंबीरपणे नागरीकांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक श्री. कडासने यांनी केले.
पोलीस दलाच्या महिला आणि पुरूष तुकडीने कवायत मैदानावर ‘गो वोट’चा संदेश देणारी मानवी रांगोळी साकारून अनोख्या पद्धतीने संदेश दिला. दरम्यान जिल्ह्यात व्यापक मतदार जाणीव जागृतीसाठी विविध माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी व्यक्त केला.