बुलडाण्यात दोन नामांकित हॉस्पीटलचे कर्मचारी करित होते रेमडेसीवीरचा काळाबाजार .. पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बुलडाणा शहरातील दोन नामांकित हॉस्पीटले 3 कर्मचाऱ्याना रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करतांना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने पकडले आहेत. एका हॉस्पीटलचे दोन आणि दूसर्या हॉस्पीटलचा एक कर्मचारी मिळून एकुण 9 रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून बुलडाणा एलसीबीचे पीएसआय श्रीकांत जिंदमवार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून या तिघांना येळगाव फाटा व जांभरून रोड या दोन ठिकाणाहून जेरबंद केले. पकडलेले 3 ही कर्मचारी ज्या हॉस्पिटल मध्ये काम करत होते त्या दोन्ही हॉस्पीटलला मेडीकल ऍटॅच आहेत. याच मेडीकलमधून रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकण्याचा धंदा सुरु असल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधीत हॉस्पीटलच्या डॉक्टरांचा या प्रकरणाशी किती संबंध आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत पोलिस कारवाई सुरु होती.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा जिल्ह्यात एलसीबीची ही दुसरी कारवाई असून यापूर्वी नांदुरा शहरात रेमडीसीविर इंजेक्शन ची काळाबाजारी करणाऱ्या 3 लोकांना अटक करण्यात आले होते.