वेळेत निदान व उपचार केल्यास म्युकर मायकोसिस होतो पुर्ण बरा…जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची माहिती*

0
77

*वेळेत निदान व उपचार केल्यास म्युकर मायकोसिस होतो पुर्ण बरा…जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची माहिती*

: कोविड बाधीत रूग्णांमध्ये म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशी हा आजार दिसून येत आहे. म्युकर मायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य आजार आहे. या आजारावर वळेत निदान व उपचार केल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी जागरूक राहून उपचार घ्यावेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे यांनी आज दिली.
म्युकर मायकोसिस हा आजार म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत, खतामध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकांत व नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. ज्या व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रूग्णांमध्ये म्युकर मायकॉसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते.
*ह्या आजाराचा धोका अधिक कुणाला आहे :*
ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा मधुमेह अनियंत्रीत आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे. ज्यांना इम्युनमोड्युलेटर्स अर्थात रोग प्रतिकारकशक्तीत फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे, ज्यांना जुनाट किडनी किंवा लिवरचा आजार आहे.
*म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी हे करा :*
रक्तातील साखरेची, एचबीए१सीची तपासणी करा, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा, कोविड नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायर मध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा, अँटिबायोटिक / अँटीफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.
*हे करू नका :*
आजाराची चिन्हे व लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरीयल सायनुसायटिसमुळे असावे असा विचार करू नका (विशेषत: इम्युनोसप्रेशन झालेले आणि कोविडमुळे ज्यांना इम्युनोमॉड्युलेटर्स चे उपचार दिले गेले आहेत) या आजाराची तपासणी करून घेण्यास आग्रही राहून दुर्लक्ष करू नका.
धोकादायक परिणाम टाळण्यासाठी *या लक्षणांवर लक्ष ठेवा :*
डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सुज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे व दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम.
तरी वेळीच उपचार, निदान केल्यास म्युकर मायकोसिस पुर्णपणे बरा होतो. नागरीकांनी घाबरून न जाता जागरूक राहून उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉ कांबळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here