*सोयाबीन – कापूस प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक*
*रविकांत तुपकर मांडणार मागण्या : ९ मंत्र्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश*
बुलडाणा, दि. (प्रतिनिधी) :-
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा सोयाबीन आणि कापूस प्रश्नांसह इतर मागण्यांबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठे रान पेटवले होते. अन्नत्याग आंदोलन चिघळल्यानंतर राज्य शासनाने रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले. त्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दालनात दुपारी अडीच वाजता बैठक होऊ घातली आहे. रविकांत तुपकर यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असून राज्य मंत्रीमंडळातील तब्बल ९ मंत्री आणि संबंधित विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सोयाबीन-कापूस प्रश्नावर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विदर्भ व मराठवाडाव्यापी आंदोलन उभारण्यात आले होते. ३१ ऑक्टोंबर रोजी बुलडाण्यात तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा धडकला आणि याच मोर्चात तुपकरांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दौरा केला. ११ नोव्हेंबर रोजी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे कापूस – सोयाबीन परिषद पार पडली आणि राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात विदर्भ, मराठवाडाव्यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर तुपकरांनी १७ नोव्हेंबर रोजी राज्याची उपराजधानी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन सरु केले. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करुन नागपूर पोलिसांनी जबरदस्तीने तुपकरांना ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात १८ नोव्हेंबरच्या सकाळी बुलडाण्यात आणून सोडले. मात्र तुपकरांनी त्यांच्या निवास्थानासमोरच आपले आंदोलन पुढे सुरु ठेवले. या दरम्यान रविकांत तुपकर यांची प्रकृती अधिक खालावली तर दुसरीकडे गावागावात सरकारविरोधात रोष निर्माण झाला, प्रभात फेरी, रास्तारोको, धरणे आणि गावबंद अशा आंदोलनास सुरुवात झाली. शेख रफीक या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला परंतु त्यानंतर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चिखली रस्त्यावर उतरुन रास्तारोको केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद उफाळून राडा निर्माण झाला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे वाहन तोडले, रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक केली. तर रात्री उशीरा तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते. २० नोव्हेंबर रोजी तुपकर यांच्या अन्नत्यागाचा चौथा दिवस होता त्यांची प्रकृती खालावली होती. पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी या आंदोलनात मध्यस्थी केली. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सुचनेवरुन ना. डॉ. शिंगणे सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले. राज्य सरकारने तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अध्यतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक होत आहे.
या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, उर्जा मंत्री ना. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री ना. दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री ना. शंभुराज देसाई, कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, शेतकरी नेते रविकांत तुपकर,नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागचे प्रधान सचिव, उर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी विभागाचे सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, सहकार आयुक्त, पणनचे संचालक यांच्यासह अन्य सर्व संबधित अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रविकांत तुपकर या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यसा आणि सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य शासनासमोर मांडणार आहेत.