परीक्षेला कॉपी नाही , अन् चुकीला माफी नाही
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाड यांचा सज्जड इशारा
बुलढाणा (प्रतिनिधी), दि. 20 :-
देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणातून घडली पाहिजे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार व कॉपीची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून यापुढे परीक्षेला कॉपी नाही , अन् चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला आहे.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या पूर्वसंध्येला आज जिल्हा परिषदेतील वॉर रूममध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा अंमलबजावणीबाबतच्या पत्रकार परिषदेला संबांधित केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, शिक्षण निरीक्षक जगन मुंढे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना विशाल नरवाडे म्हणाले की, परीक्षेच्यावेळी दिवसेंदिवस वाढत चाललेले गैरप्रकार चिंताजनक आहेत. ही स्थिती पालकांसह आपल्या सर्व समाजासाठी धोकादायक आहे. परीक्षेत कॉपी करता येते, त्यामुळे मी पास होणारच! हा चुकीचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असून तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्यादृष्टीने घातक आहे. कॉपीची कुप्रथा मोडीत काढणे ही काळाची गरज असून सोबतच शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास वाढविणे हे सर्वांसमोरचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान स्विकारून गैरप्रकारांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी विशद केली.
कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी काय? या पत्रकांरांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना विशाल नरवाडे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर विभागांच्या अधिकारी-कर्मचा-यांचा सहभाग घेऊन विविध स्तरावर बैठे पथक, भरारी पथक, पोलीस सुरक्षा अशा नियमित उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच विशेष दक्षता आवश्यक असलेले परीक्षा केंद्र, संवेदनशील परीक्षा केंद्र व सर्वसाधारण परीक्षा केंद्र अशी वर्गवारीसुध्दा करण्यात आलेली आहे. मात्र त्या व्यतिरिक्त यावेळी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन संनियंत्रणाचा अभिनव प्रयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता 12 वी च्या 117 परीक्षाकेंद्रावर सुमारे 1350 वर्गखोल्यांमध्ये 33 हजार 757 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वच परीक्षा केंद्रावर व वर्गखोल्यामध्ये CCTV उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशावेळी झूम ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टिमची चाचपणी सुरु आहे. यामाध्यमातून परीक्षा वेळेत प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीतील घडामोडी पेपरच्या वेळेत सकाळी 10 .30 ते 2.30 या वेळेत रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर अथवा आवश्यकतेप्रमाणे तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येणार आहेत. या कक्षामध्ये परीक्षा काळातील लाईव्ह फीड मॉनिटर व रेकॉर्ड केला जाणार आहे. हे करतांना परीक्षाविषयक सर्व नियमांचे पालन होईल, सोबतच प्रशासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही इत्यादी बाबींची तपासणी सुध्दा सुरू असल्याचे विशाल नरवाडे यांनी सांगितले.
हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी असून यामध्ये प्रशासनाबरोबरच सर्व पालक, शिक्षक संघटना , सामाजिक संघटना, प्रसामाध्यमे अशा सर्व घटकांची सकारात्मक भुमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी आपआपल्यापरीने सहकार्य करावे, असे आवाहन सुध्दा विशाल नरवाडे यांनी केले. त्याचप्रमाणे उपलब्ध कालावधी, संसाधने लक्षात घेता हा प्रयोग पहिल्याच वर्षी 100 टक्के यशस्वी होईल आणि आम्ही क्रांतिकारक बदल करू असा दावा सुध्दा आम्ही करणार नाही. मात्र कुठेतरी एका चांगल्या, निकोप , भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेसाठी उचललेले हे पाऊल भविष्यात निर्णायक ठरेल , असा विश्वास सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केला. तसेच इयत्ता 10 व 12 वी परीक्षा होईपर्यंत परीक्षा यंत्रणेतील सर्व घटकांवर विविध माघ्यमांव्दारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे परीक्षेला कॉपी नाही , अन् चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी भविष्यात आपल्या कार्यशैलीबाबतचा सूचक इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेच्या अखेरीस त्यांनी सर्व परीक्षार्थ्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या.