किन्होळा कोविड सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट*

0
44

*किन्होळा कोविड सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट*
*रविकांत तुपकरांच्या संकल्पनेतील उपक्रमाला थेट अमेरीकेतून मदत*

बुलडाणा, दि. (प्रतिनिधी) : –
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून किन्होळा येथे जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून निर्माण झालेले कोरोना आयसोलेशन सेंटर सुरु झाले. हळू हळू या आयसोलेशन सेंटरचे रुपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये होत आहे. तुपकरांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता थेट अमेरीकेतूनही मदतीचा हात समोर आला आहे. रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतील कोविड सेंटरच्या उपक्रमाला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट मिळाले आहेत.
सध्या कोरोनाची लाट ओसरत असून संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी महिनाभरापूर्वी जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत भिषण आणि विध्वंसक झाली होती. त्यावेळी रविकांत तुपकर यांनी ग्रामीण भागात गावागावांमध्ये आयसोलेशन सेंटर निर्माण व्हावे, अशी संकल्पना मांडली आणि त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांची संकल्पनेतून आणि किन्होळा ग्रामस्थांच्या पुढाकाराने किन्होळ्यात लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले आयसोलेशन सेंटर सुरु झाले. किन्होळा पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हा पॅटर्न जिल्हाभर राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तर राज्याच्या सचिवांनी देखील किन्होळा पॅटर्नचे कौतुक केले. दरम्यान या सेंटरमध्ये रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून समाजातील नागरिकांनी, दानशुरांनी हातभार लावण्यास सुरुवात केली. रविकांत तुपकर यांच्या या उपक्रमाची माहिती अमेरीकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले त्यांचे मित्र तथा बुलडाणा येथील एकता नगरमधील रहिवासी आनंद बाबुराव जाधव यांना मिळाली. त्यांनी तुपकरांशी संपर्क साधून आपल्या जिल्ह्यातील, गावातील रुग्णांसाठी काहीतरी करण्याची तयारी दाखवित आयसोलेशन सेंटरच्या या उपक्रमाला हातभार लावण्याची तयारी दर्शविली आणि एक नव्हे तर दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट देण्याचा मानस व्यक्त केला. लगेच या दोन मशीनची ऑर्डर देण्यात आली परंतु मशीन उपलब्ध होण्यास थोडा विलंब झाला. दरम्यान २७ मे रोजी हे कॉन्सट्रेटर बुलडाण्यात पोहचले आणि आज २८ मे रोजी किन्होळा आयसोलेशन सेंटर येथे नेण्यात आले. किन्होळा गावातील रुग्णांना येथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून आता ऑक्सिजनची देखील सुविधा उपलब्ध झाल्याने आयसोलेशन सेंटरनव्हे तर कोविड हॉस्पिटल निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे आता किन्होळ्यासह पंचक्रोषीतील रुग्णांना देखील भरती करुन घेतले जाईल, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी बोलताना दिली. ‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ या म्हणी प्रमाणे आनंद जाधव अमेरीकेत असले तरी त्यांचे चित्त आपलया जिल्ह्यात आहे. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आपणही काहीतरी मदत करावी, आपलेही सामाजिक उत्तरदायीत्व आहे या भावनेतून त्यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपबल्ध करुन दिल्याची माहिती यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली. यावेळी रविकांत तुपकर, आनंद जाधव यांचे बंधू सचिन बाबुराव जाधव,प्रभुकाका बाहेकर, प्रा. जगदेवराव बाहेकर,पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर आदींच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे पूजन करण्यात आले. तसेच या आयसोलेशन सेंटरसाठी प्रा. जगदेवराव बाहेरकर यांनी अकरा हजार रुपयांची मदत यावेळी दिली. यावेळी डॉ.अनिल साळोख, डॉ.योगेश परिहार यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here