*आयुष्यभर आपल्या लेखणीतून समाज परिवर्तन करण्याचे यथोचित कार्य प्र.ई. सोनकांबळे यांनी केले…डॉ.दैवत सावंत*
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
औरंगाबाद ( प्रतिनिधी )
साहित्य ही मानवी मनाची सर्जनशील निर्मिती असते. लेखक आपल्या अनुभवात्मक विचारांना लेखणीच्या रूपाने अविष्कृत करीत असतो. जगण्याच्या कंगोऱ्यांना आशय देत जातो. आजूबाजूचे सर्वांगीन वास्तव मांडत राहणे हे मनाचे कार्य असते. त्यामुळे त्या साहित्याला वलय प्राप्त होते. मराठी साहित्य हे वेगवेगळ्या अनुभव शैलीतून जन्माला आलेले आहे.आज मराठी साहित्यात अनेकविध प्रवाह उदयाला आलेले आहेत. स्वतंत्र जीवनशैली निर्मितीची शक्ती या प्रवाहात असल्याने मराठी साहित्य सातासमुद्रापार पोहोचलेले आहे.यातील एक महत्त्वपूर्ण प्रवाह म्हणून दलित साहित्य प्रवाहाची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते.
दलित साहित्यांतर्गत आत्मकथन हा साहित्य प्रकार भारतीय साहित्य विश्वाला ज्यांनी नियतकालिकाच्या माध्यमातून दिला ते प्र.ई.सोनकांबळे. त्यांनी संभ्रम अवस्थेच्या काळात मराठीला नाविन्यपूर्ण लेखन दिले. खऱ्या अर्थाने बिनचेहऱ्याच्या गावात जन्मलेल्या सोनकांबळे यांनी स्वतःची, गावाची ओळख जगाला करून दिली,ती केवळ आपल्या लेखणीतून.त्यांनी ‘आठवणीचे पक्षी’,’असं हे सगळं’ , ‘पोत आणि पदर’आदि त्यांची ग्रंथसंपदा होत. मराठी साहित्यात त्यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ या आत्मचरित्राने स्वतंत्र ओळख निर्माण करून आदर्शवादी लेखनाचे रूप निर्माण केले. प्रारंभी त्यांनी गल्लेबोरगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य केले.नंतरच्या काळात डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक व प्राचार्यपद भूषविले.हे सर्व करत असताना त्यांनी साहित्यावरचे आपले प्रेम एतकिंचितही ढळू दिले नाही.
‘आठवणींचे पक्षी’या आत्मचरित्राला साहित्यविश्वात सन्मान मिळाला.त्यातील प्रत्येक कथा वाचकांना खिळवत गेली.पारंपरिक दारिद्र्य असल्याने जीवन जगताना येणारे जीवघेणे अनुभव या पुस्तकात येतात .मूलतः दलित साहित्याची विषमतेविरुद्ध आवाज उठविण्याची भूमिका राहिलेली आहे.सातत्याने होणार्या अन्यायाला आवाज देण्याचे कार्य या चळवळीमुळे झाले ,हे नाकारता येत नाही. त्यामुळे संवेदनशील लेखक या प्रकारच्या जबाबदारीतून कधीच पळवाट काढत नसतो. लेखकाच्या जबाबदारी संदर्भात अण्णा भाऊ साठे म्हणतात ,’आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे.’ हा मंत्र संबंध आयुष्यभर प्र.ई. सोनकांबळे यांनी जपलेला आहे.आपल्या लेखनात प्रक्षोभक भाषेचा वापर न करता अतिशय संयत भाषेचा वापर केल्यामुळे त्यांच्या लेखनाला वाचकांनी डोक्यावर घेतले.याच नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण लेखनामुळे महत्त्वाच्या अशा साहित्य अकादमीने त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे .आजमितीला त्यांच्या साहित्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे .एका अर्थाने त्यांच्या साहित्याबरोबरच मराठी भाषेचाही तो गौरवच म्हणावा लागेल .
जन्मापासूनच हलाखीची परिस्थिती असल्यामुळे बालपणापासूनच त्यांना कष्ट करावे लागले .परिस्थितीच माणसाला लाचार बनविते,न पटणारे काम करण्यास भाग पाडते.या प्रकारचे जीवनही सोनकांबळे यांच्या वाट्याला आले.या विविधांगी जीवनाचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या साहित्यात केलेले आहे .जे अनुभवले,जगले ते जीवन साहित्यात मांडण्याचे काम सोनकांबळे यांनी केले.
‘आठवणींचे पक्षी’या आत्मकथने मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले ; नव्हे तर मराठी आत्मकथनाचा केंद्रबिंदू हेच आत्मकथन ठरले,हे नाकारता येत नाही.प्र.ई.सोनकांबळे यांचे शिक्षण मराठवाड्याच्या राजधानीत झाल्याने या भूमिचे वेगळेपण त्यांच्या साहित्यातही प्रकटते.डॉ. कमलाकर कांबळे या भूमिचा गौरव करतात ‘मिलिंद संस्कृती ही दलित आत्मकथनपर लेखनाची गंगोत्री आहे.’आपल्या जीवन अनुभूतीचा आवाज या भूमीतून सातत्याने घुमलेला आहे .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलमंत्राचा विचार करणाऱ्या मायीने समभावाची वाट धरली.याचा प्रभाव प्र.ई.सोनकांबळे यांच्या साहित्यावरही प्रखरपणे दिसतो.त्यामुळेच संयम ,प्रामाणिकपणा, कर्तव्यनिठा,सेवाभाव,कष्टप्रधानता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये ठरतात.अर्थात आयुष्यभर आपल्या लेखणीतून समाज परिवर्तन करण्याचे यथोचित कार्य प्र.ई. सोनकांबळे यांनी केले आहे, असे म्हणता येते.डॉ.दैवत सावंत,औरंगाबाद