बुलडाणा: छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित कर्मचारी व मान्यवरांनीही अभिवादन केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत बंद केली. बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही अनेक उपक्रम त्यांनी राबवले. अशा या लोकराजाच्या स्मृतींना समाजोपयोगी उपक्रमातून उजाळा देण्याचा आपला सदैव प्रयत्न असतो असे प्रतिपादन संदीपदादा शेळके यांनी केले. याप्रसंगी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, ऋषिकेश म्हस्के यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.