0
113

“आम्ही बुलडाणेकरांची प्रत्यक्ष मदत …कोकणच्या पूरग्रस्तांना पोहचली

बुलडाणा प्रातिनिधी

पूरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालेल्या कोकणमध्ये प्रत्यक्ष गावात जाऊन पुरग्रस्तांच्या हातात मदतीची कीट देऊन “आम्ही बुलडाणेकर…” सोमवारी 16 ऑगष्ट रोजी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी, 14 ऑगस्टला आम्ही बुलडाणेकर… यांनी कोकणासाठी प्रयाण केले होते. सांत्वना… दिलासा…आणि आधार देण्याचा एक अल्प प्रयत्न यामाध्यमातून होणार आहे. मागील दहा दिवसांपासून आम्ही बुलडाणेकरांनी कोकण पुरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला होता. समाजातील सर्वच वर्गाने आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत यथाशक्ती मदत दिली. आम्ही बुलडाणेकरांच्या सादेला सामान्यांनी भरभरून प्रतिसाद दिला… मदतपेटीत पैसे नव्हे तर माणूसकी सामावली होती. 300 कुटुंबांना प्रत्येकी चटई, ब्लॅंकेट, 2 प्लेट, 2 टॉवेल, एक लोटा, कढई, पळी, एक डब्बा अशी मदत कीट तयार करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्यक्ष गावात जाऊन मदत करण्याच्या हेतूने वाहतुकीचा खर्च मिळून एकूण 2 लक्ष 51 हजार रुपयांचा मदत निधी अपेक्षित होता. पाण्याचा पूर ओसरला होता पण माणूसकीचा पूर वाढतच राहिला…. अपेक्षित निधीची पातळी ओलांडली गेली होती.

विशेष म्हणजे, आता मदतीची रक्कम जमा झाल्यामुळे मदतीचा स्वीकार करणे थांबविण्यात आले होते. आवश्यक निधीतून वाजवी किंमतीत वस्तू देणाऱ्या सहृदयी व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यात आला. शुक्रवारी, संपूर्ण दिवसभर जवळपास 30 ते 40 जणांनी मिळून वरील दहा वस्तूंची एक, याप्रमाणे 301 कीट तयार केल्यात. एका मोठ्या आयशर ट्रक मध्ये ह्या कीट भरून आज आम्ही बुलडाणेकर…ची एक टीम महाड साठी रवाना झाली होती.

महाड, पोलादपूर शहर आणि तालुक्यातील जवळपास 101 गावे पूरग्रस्त आहेत. त्यातील 46 गावांमध्ये शतप्रतिशत नुकसान आहे. 1200 पेक्षा अधिक पशुहानी झाली आहे तर 3 माणसे दगावलीत. या दोन तालुक्यात आम्ही बुलडाणेकर यांनी मदत कीट दिली. महाड तालुक्यातील राजेवाडी गावात 33 कीट, शहरातील संत रविदास नगरमध्ये 55 कीट, नंतरपोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे 18 कीट, अकले गावात 67 कीट, अकलेवाडी गावात 37 कीट, भोरगांव येथे 50 कीट तर कापडे बु. गावातील आदिवासी पाड्यात 41 कीट वितरीत करण्यात आल्या. या संपूर्ण मदत वितरण दौऱ्यात खऱ्या गरजवंताला मदत पोहोचविण्यासाठी डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. त्यांचे सुपुत्र पंकज बावस्कर, पोलादपूरचे आरोग्य कर्मचारी प्रकाश धनवे, डॉ. सचिन कंकाळ, रफिक आदिंचेही सहकार्य लाभले. महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद यांनी आम्ही बुलडाणेकर यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

  1.            

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता, त्या सुतारवाडीला “आम्ही बुलडाणेकर…” यांनी सांत्वना भेट दिली. येथील दुःखी 18 परिवारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत कीट देण्यात आली. दरड कोसळण्याच्या ठिकाणचे आम्ही बुलडाणेकरांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. संपूर्ण घटनाक्रम आणि त्या जीवघेण्या संकटाचे अनुभवकथन मन विषण्ण करणारे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here