पिकांचे व शेतजमिनींचे नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणातील ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा टप्प्याटप्प्याने विसर्ग करा*

0
67

*पिकांचे व शेतजमिनींचे नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणातील ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा टप्प्याटप्प्याने विसर्ग करा*

बुलडाणा, दि. २७ (प्रतिनिधी) ;- येळगाव धरणावर बसविण्यात आलेले स्वयंचलीत गेट धरण भरल्यानंतर उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नदीत येतो. परिणामी नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी होते. शेतजमिनीही खरडून जातात. पावसाळ्यात नेहमीच या समस्येला नदीकाठच्या बारा गावांमधील शेतकरी त्रस्त होतात. धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू व्हावा याकरिता तीन मानवनिर्मित गेट उभारून तेथे पालिकेचे कर्मचारी तैनात करावे म्हणजे पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

धरण भरल्यानंतर एकाचवेळी ८० स्वयंचलीत गेट उघडल्या जात असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग धरणातून पैनगंगा नदीत सोडण्यात येतो. त्यामुळे पूरपरिस्थिती तयार होते व यामुळे पिकांचे व शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने येळगाव, सव, किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, खुपगाव, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, पेठ, उत्रादा, बोरगाव काकडे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर व भारत बोंद्रें सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. विसर्ग हळूहळू सोडून ही समस्या दूर करावी, याच मागणीच्या अनुषंगाने माजी मंत्री भारत बोंद्रे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी दोन्ही नेत्यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याबाबत निवेदन सादर केले व १२ गावांतील ग्रामपंचायतचे ठराव या मागणीच्या अनुषंगाने सादर केले.
सुरुवातीला धरणावर सांडवा होता. त्यामुळे नदीच्या पुरामुळे शेतीचे नुकसान होत नव्हते. यानंतर येळगाव धरणावर स्वयंचलित गोडबोले गेट बसविण्यात आले. येळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर स्वयंचलित गेट आपोआप उघडले जावून धरणातील पाण्याचा मोठा प्रवाह नदीपात्रात येतो. या प्रवाहामुळे वरील गावांमधील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे नुकसान होते. हजारो हेक्टरवरील जमीन खरडून जाते, ही बाब माजी मंत्री बोंद्रेंनी व तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. सांडवा तयार करणे, नदीखोलीकरण करणे आणि किमान तीन मानवनिर्मित गेट धरणावर उभारण्याची गरज तुपकर यांनी व्यक्त केली. धरणातील पाण्याची पातळी कायम ठेऊन तसेच अतिवृष्टीचा अंदाज घेऊन हळूहळू मानवनिर्मित गेटमधून पाणी सोडायला हवे. पाण्याचा अंदाज घेऊन विसर्ग करण्यासाठी नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांची त्याठिकाणी नियमित ड्युटी लावावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.
यावेळी शंतनू बोंद्रे,शंकरमहाराज येळगावकर,दिलीप राजपूत,विनायक सरनाईक,पवन देशमुख,शेख रफिक शेख करीम, दत्ता जेऊघाले,विलास वसु,बाळू येसकर,गणेश पाटील,श्रीकृष्ण गव्हाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*जिल्हाधिकारी व न.प.प्रशासनाकडून मागणीची तात्काळ दखल*

तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू शकते ही गंभीर बाब माजी मंत्री भारत बोंद्रे व रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी न.प. मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनतर न.प.प्रशासनाने सायंकाळी येळगाव धरणाचे 5 गेट खुले करून ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा विसर्ग केला. यामुळे नदीकाठावरील शेतीचे व शेतीपिकांचे नुकसान टळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here