*पाणी गुणवत्ता अंतर्गत महिलांना मिळणार ग्रापंचायतस्तरावर प्रशिक्षण
- बुलडाणा (प्रतिनिधी )
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातंर्गत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता याबाबत विविध उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यातील दहा निवडक जलसुरक्षक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षेत २३ रोजी पार पडले. सदर प्रशिक्षणासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता चंदनसिंग राजपुत, उप अभियंता सी. के. पिंपरकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी एन. सी. मुळे हे उपस्थित होते.
गावातील लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे या दृष्टीने वर्षातून दोन वेळेस पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी नियमितपणे होत असते. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण हे सुध्दा वर्षातून दोन वेळेस होत असते. सदर बाबींची नोंद ही शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता गावस्तरावरच कळावी या अनुषंगाने जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींमध्ये ४३४५ महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाद्वारे पिण्याच्या पाण्यातील जैविक घटक व रासायनिक घटक यांचे प्रमाण स्थानिक पातळीवरच कळणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी १० निवडक जलसुरक्षक प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षक यांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली. या वेळी प्रास्ताविक करतांना करतांना मनुष्यबळ विकास सल्लागार यांनी प्रशिक्षणाबाबतची भुमिका विशद करतांना पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता हा महत्वपुर्ण घटक असून यासाठी गावस्तरावरच एक यंत्रणा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना पाणी गुणवत्ता निरीक्षक शरद ठाकुर यांनी जलसुरक्षकांची कर्तव्य व जबाबदारी याबाबत माहिती देतांना पाणी गुणवत्ता कार्यक्रमात त्यांची भुमिका गावपातळीवर महत्वाची आहे असे सांगितले. त्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याची फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणी कशी करावी याबाबतची सविस्तर माहिती दिली. पाणी गुणवत्ता सल्लागार श्रीमती किरण शेजोळे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या गावातच महिलांना याबाबतचे प्रशिक्षण मिळाल्याने पिण्याच्या पाण्याबाबतची शुध्दता याबाबतची जागृती होण्यास मदत होईल. यावेळी समजविकास सल्लागार समीर बेग यांनीही मार्गदर्शन केले.
जलसुरक्षकांद्वारे गावातील महिलांना प्रशिक्षण मिळाल्याने पिण्याच्या पाण्याबाबतची गुणवत्ता गावस्तरावरच त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करता येईल. यासाठी प्रशिक्षित प्रत्येक महिलेने व जलसुरक्षकाने याबाबत योग्य कार्यवाही करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या आहेत. तसेच पाणी गुणवत्ता कार्यक्रमात प्रामस्थांनीही सहभाग नोंदवून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनिषाताई पवार व उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांनी केले आहे.