समाजाने पागोरे यांचा आदर्श घ्यावा- भाऊसाहेब शेळके
बुलडाणा : साधारण परिस्थितीतून पुढे येत किशोर पागोरे यांनी यश मिळवले आहे. बिनपगारी शिक्षक, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी असा त्यांचा संघर्षमय प्रवास राहिलेला आहे. समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी केले.
शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल किशोर पागोरे यांचा मंगळवारी ९ फेब्रुवारी रोजी शाहू परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब शेळके बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात पूर्ण निष्ठेने काम केल्यास नक्की यश मिळते. किशोर पागोरे यांनी सुरुवातीपासून शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून देत काम केले. त्याचे फळ त्यांना शिक्षणाधिकारीपदी पदोन्नतीने मिळाले आहे. त्यांची पत्नी सुद्धा तहसीलदार असून सध्या त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारीपदाचा पदभार आहे. पागोरे दाम्पत्याचा जीवनप्रवास बोध घेण्यासारखा आहे. भविष्यात त्यांच्या प्रगतीचा आलेख चढता राहो, अशी अपेक्षा भाऊसाहेब शेळके यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्याम सावळे पाटील, माणिकराव सावळे, सरव्यवस्थापक नितीन उबाळे, भागवत गव्हाणे, आस्थापना अधिकारी जाकीर शहा, विभागीय व्यवस्थापक दत्तू चवंड, संगीता सोनोने, शीतल सावळे, विनोद चव्हाण, नितीन सुरडकर यांच्यासह कर्मचारी, ग्राहक व खातेदार उपस्थित होते.